28 AUG 1733 SEKHOJI ANGRE-DIED

Mathurabai Angre Samadhi – मथुराबाई आंग्रे यांची समाधी

मथुराबाई आंग्रे यांची समाधी. छत्रीबाग, शिवाजी चौक, अलिबाग.

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ज्येष्ठ पत्नी. आणि स्वराज्याच्या दोन सरखेलांची आई; सरखेल सेखोजी आंग्रे आणि सरखेल संभाजी आंग्रे.

Mathurabai Angre’s Samadhi, Chhatribag, Shivaji Chowk, Alibag.

First wife of Sarkhel Kanhoji Angre. Mother to two Admirals of Maratha Navy – Sarkhel Sekhoji Angre & Sarkhel Sambhaji Angre.

Thursday, January 8, 2015

Galbat Sadashiv – गलबत सदाशिव

गलबत “सदाशिव”, सरखेल सेखोजी आंग्रे यांच्या स्वारीचे गलबत.

भारत इतिहास संशोधक मंडळ, सदाशिवपेठ पुणे, येथील चित्रातील एक भाग.
गलबताखाली चित्रकाराची टिप्पणी असी…
“गलबत सदासीव खासा सेखो
जी बावाचे स्वारिचें ||”

=========
Galbat “Sadashiv”, flagship of Sarkhel Sekhoji Angre.

From a painting at Bharat Itihas Sanshodhak Mandal, Sadashiv Peth, Pune.

आंग्रे घराणे

आंग्रे घराणे
– सु. र. देशपांडे.
मराठ्यांचा इतिहास घडविणाऱ्या प्रसिद्ध घराण्यांपैकी एक. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे आंग्रे घराण्याचे मूळ गाव व शखपाळ-शंकपाळ-संकपाळ हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु आंगरवाडी ह्या काळोसेतील एका छोट्या भागावरून त्यांस पुढे आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले. सेखोजी हे या घराण्यातील पहिले ज्ञात पुरुष. त्यांचे चिरंजीव तुकोजी हे उत्तर कोकण काबीज करीत असता शहाजींनी चौलजवळ १६४० मध्ये जी दर्यावरील लढाई केली, तीत प्रथम प्रसिद्धीस आले. १६५९ मध्ये ते शिवाजीच्या पदरी गेले. त्यांस मराठी आरमारातील २५ असामींची मुखत्यारी होती. पुढे ते आपल्या कर्तबगारीने सरनौबतीच्या हुद्द्यापर्यंत चढले. १६८०त तुकोजींचे निधन झाल्यावर त्यांचा मुलगा कान्होजी  ह्यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. कान्होजी हेच आंग्रे घराण्यातील सर्वांत कर्तबगार पुरुष आणि आंग्रे घराण्याचे खरे संस्थापक होत.
छत्रपती संभाजींच्या वधानंतर छत्रपती राजाराम ह्यांस जिंजी येथे जावे लागले. त्या सुमारास कान्होजींचा पराक्रम कोकणपट्टीवर दिसू लागला. १६९४–१७०४च्या दरम्यान त्यांनी पश्चिम किनारपट्टीतील मोगलाकडे गेलेले मराठ्यांचे सर्व किल्ले परत घेतले; शिवाय कुलाबा जिंकून त्यास आपले प्रमुख ठिकाण केले व त्यांनी  “आपण कोकणकिनाऱ्याचे राजे” अशी घोषणा केली. छत्रपती राजाराम ह्यांनी त्यांची ही कामगिरी व पराक्रम लक्षात घेऊन त्यांस मराठी आरमाराचे आधिपत्य देऊन सरखेल हा किताब दिला. राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्‍नी ताराबाई ह्यांनी कान्होजींस आपल्या पक्षात सामील करून घेऊन त्यांस राजमाचीचा किल्ला व भिवंडी प्रांताचा बंदोबस्त करण्यास दिला आणि सरखेल हा किताब कायम केला. पुढे १७०७ मध्ये छत्रपती शाहू  हे मोगलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर छत्रपतींच्या गादीबद्दल ताराबाई व शाहू ह्या उभयतांत वाद निर्माण झाला. पण अखेर शाहूंची सरशी होऊन सातारची छत्रपतींची गादी शाहूंस मिळाली. नंतर शाहूंनी कान्होजींवर बहिरोपंत पिंगळे ह्या आपल्या पेशव्यास धाडले. परंतु त्याचा काही उपयोग न होता तो कान्होजींच्या कैदेत मात्र पडला. तेव्हा शाहूंनी बाळाजी विश्वनाथ व कान्होजी ह्यांचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध लक्षात घेऊन बाळाजीविश्वनाथह्या आपल्या पेशव्यास त्यांविरुद्ध धाडले. बाळाजींने कान्होजींबरोबर तह करून त्यांस शाहूंच्या पक्षात सामील करून घेतले आणि त्यांस काही मुलुख, सरखेलपद आणि मराठी आरमाराचे आधिपत्य शाहूंकडून देवविले. ते अखेरपर्यंत, म्हणजे १७२९ पर्यंत शाहूंच्या पक्षात होते.
कान्होजींनी  मराठ्यांचे आरमार वृद्धिंगत आणि कार्यक्षम केले. त्यांच्या कारकिर्दीत कोणपपट्टीत इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज वगैरे परकीय किंवा सिद्दी यांसारख्यांवर मराठ्यांचा वचक होता. कान्होजींची जहाजे त्रावणकोर-कोचीनपासून उत्तरेस सुरत-कच्छपर्यंत निर्वेधपणे समुद्रातून संचार करीत. कान्होजींनी कुलाब्यास जहाजे बांधण्याचे काम सुरू करून जहाजबांधणीधंद्यास उत्तेजन दिले होते. त्यांनी मराठेतर जहाजांना सुरक्षिततेची हमी म्हणून काही कर घेऊन परवाने देण्याचा यशस्वी उपक्रम यूरोपीय सत्ताधाऱ्यांप्रमाणे चालू केला. त्यामुळे मराठ्यांचा व्यापार वाढला आणि मराठी सत्तेचा मान द्दढावला.
कान्होजींस सेखोजी, संभाजी, मानाजी, तुळाजी, येसजी व धोंडजी असे सहा पुत्र झाले. कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र सेखोजी हे सरखेल (१७२९–३४) झाले. ह्या वेळी सिद्दीसाताने ब्रह्मेंद्रस्वामींचे परशुरामक्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा सिद्द्याचे पारिपत्य करण्यासाठी पहिले बाजीराव कोकणात उतरले. त्यास सेखोजींनी मदत केली. त्यांनी पेशवे व छत्रपत्ती ह्या दोघांशी सलोखा ठेवून आरमाराची वृद्धी केली. पण ते १७३३ मध्ये निधन पावल्यावर आंग्रे घराण्यात अंत:स्थ कलह सुरू झाला. संभाजी व मानाजी या भावांत सरखेलीबद्दल वितुष्ट निर्माण होऊन त्याचा परिणाम साहजिकच सिद्दी, इंग्रज, पोर्तुगीज इत्यादींवरील मराठ्यांचा वचक कमी होण्यात झाला. दोघेही आपले स्वार्थ व सत्ता वाढविण्याच्या मागे लागले. त्यामुळे परस्परांविरुद्ध दोघेही परकीयांची मदत घेऊ लागले. म्हणून पहिले बाजीराव ह्यांनी ह्या भांडणात मध्यस्थी करून १७३५ मध्ये संभाजींस सरखेल हा किताब व सुवर्णदुर्ग आणि मानाजींस वजारत-म्-आब हा किताब व कुलाबा देऊन दोघांना खूष करण्याचा प्रयत्‍न केला. मात्र त्यामुळे मराठी आरमारात दोन सत्ताधारी निर्माण झाले. संभाजी १७४२ मध्ये मरण पावले. त्यांस मुलगा नसल्यामुळे त्यांचा दुसरा सावत्र भाऊ तुळाजी सुवर्णदुर्गाचे अधिपती (१७४२–५६) झाले. त्यांच्या आरमारात ७४ तोफांचा गुराब, २० ते ३० टनी ८ गुराब व ६० गलबते होती. त्यांनी इंग्रज पोर्तुगीजांची अनेक जहाजे पकडली व त्यांना आपले परवाने (दस्तक) घ्यावयास भाग पाडले. सिद्दीचे अजिंक्य समजले जाणारे गोवळकोट व अंजनवेल किल्ले जिंकले व सर्वत्र दरारा निर्माण केला, पण त्यांचे पेशव्यांशी कधीच पटले नाही. त्यांनी प्रतिनिधी, अमात्य, सावंतवाडीकर, कोल्हापूरकर इत्यादींच्या प्रदेशावर अनेक वेळा आक्रमणे केली, शिवाय पेशव्यांविरुद्ध ताराबाईंशी संधान बांधले. तेव्हा पेशव्यांनी इंग्रजांच्या मदतीने १७५६ मध्ये त्यांवर विजयदुर्ग इथे चढाई केली. तीत तुळाजींचा पराभव होऊन पेशव्यांनी त्यांस कैद केले; आणि इंग्रजांनी सदर चढाईत तुळाजींचे आरमार जाळले. ह्यामुळे मराठी आरमार पुढे कायमचे खच्ची झाले. तेव्हा पेशव्यांनी स्वतचे आरमार उभे केले. कान्होजींनंतर तुळाजींइतका पराक्रमी पुरुष आंग्रे घराण्यात पुढे झाला नाही.
ह्यापूर्वी व ह्या सुमारास मानाजी आंग्रे मात्र पेशव्यांस सर्वतोपरी मदत करीत होते. त्यांनी १७३७–३९च्या मराठे-पोर्तुगीज युद्धात पोर्तुगीजांची समुद्रात नाकेबंदी करून त्यांना जेरीस आणले; आणि पुढे १७४० मध्ये तर मानाजींनी पोर्तुगीजांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. सिद्दीविरुद्धच्या मराठ्यांच्या लढाईत मानाजींनी पेशव्यांस साहाय्य केले. १७५५ मधील उंदेरीच्या मोहिमेत पेशव्यांच्या मदतीला मानाजी गेले होते. या संधीचा फायदा घेऊन सिद्दींचा सरदार आबाजी घाटगे ह्याने आंग्र्यांच्या मुलुखावर स्वारी केली. त्यामुळे मानाजी तातडीने कुलाब्यास आले आणि सिद्द्यांची कायमची खोड मोडण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यांच्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र रघोजी यांनी हे कार्य पुढे तडीस नेले. मानाजींनी  आपल्या मनमिळाऊ व साहाय्य करण्याच्या प्रवृत्तीमुळे छत्रपती व पेशवे ह्या दोघांकडे आपले चांगलेच वजन निर्माण केले होते. ते १७५९ मध्ये मरण पावले.
तुळाजी व मानाजी ह्यांच्या नंतर रघोजी हा मानाजींचा ज्येष्ठ पुत्र सरखेलपदावर आला (१७५९–९३). ह्या सुमारास अलिबागच्या उत्तरेकडील पूर्वपश्चिमपट्टी आंग्रे व पेशवे ह्यांच्या संयुक्त अंमलाखाली होती. फक्त जंजिरकर सिद्दी यांचा उंदेरीचा भाग त्यात समाविष्ट नव्हता. सिद्दीच्या उंदेरी येथे झालेल्या संपूर्ण पराभवानंतर तो पेशव्यांनी घेतला आणि त्यास ‘जयदुर्ग’असे नाव देऊन तिथे आपला अंमलदार नेमला. ही एवढी घटना सोडता रघोजींची उर्वरित कारकीर्द शांततेची गेली. मात्र इथून पुढे आंग्रे हे केवळ एक नामधारी सरदार राहिले.
दुसरे मानाजी हे रघोजींचे ज्येष्ठ पुत्र रघोजींच्या मृत्यूनंतर सरखेल झाले (१७९३–९९). अल्पवयीन असल्यामुळे त्या वेळी त्यांचा सावत्र भाऊ जयसिंगराव ह्यांना पेशव्यांनी कुलमुखत्यार म्हणून नेमले. अर्थात ही गोष्ट मानाजींची आई आनंदीबाई ह्यांना खपली नाही. त्यांनी जयसिंगरावांस मारण्याचा कट रचिला. साहजिकच उभयतांत यादवीस सुरुवात झाली. पुणे दरबारने एकंदरीत सर्व राजकीय परिस्थिती पाहून मानाजी ह्यांना साहाय्य करण्याचे ठरविले. तेव्हा जयसिंगरावांनी आलीजाह बहादुर शिंदे लष्करकर यांच्याकडे मदतीची याचना केली. शिंद्यांकडून जयसिंगरावास मानाजी व पेशवे ह्यांच्या विरुद्ध मदत म्हणून पहिले कान्होजी यांचा नातू (येसजीचा मुलगा) बाबुराव ह्यांना पाठविण्यात आले. प्रथम बाबुरावांनी जयसिंगरावांना मदत केली परंतु कुलाबासंस्थानची तत्कालीन राजकीय स्थिती लक्षात घेऊन जयसिंगराव व मानाजी ह्या दोघांस बाजूस सारून बाबुराव आपणच सरखेलपदी चढले (१७९९–१८१३). दरम्यान पेशवाई खिळखिळी होऊन अंत:स्थ कलहाला सुरुवात झाली होती. बाबुरावांच्या कारकिर्दीत सकवारबाई (जयसिंगरावांची पत्‍नी) हिचे बंड सोडले, तर इतर सर्व कारकीर्द गेली. त्यांनी अनेक लोककल्याणाची कामे केली व संस्थानातील दंगेधोपे शमविले. बाबुराव जामगाव (अहमदनगर) मुक्कामी मरण पावले. नंतर विनायक परशुराम ह्या दिवाणजींच्या मध्यस्थीने दुसरे मानाजी पुन्हा सरखेलपदी आले (१८१३–१७). पण पुढे मानाजी व दिवाणजी यांच्यात वितुष्ट आले. लवकरच दुसरे मानाजी निधन पावले. त्यांच्यानंतर दुसरे रघोजी ह्या मानाजींच्या मुलास सरखेलीची वस्त्रे दुसरे बाजीराव पेशवे यांजकडून मिळाली (१८१७–३८). हा काल मराठी सत्तेच्या धामधुमीचा व अवनतीचा होता. तथापि रघोजींनी अत्यंत शांततेने संस्थानचा कारभार केला व संस्थानची आबादानी केली. १८२२च्या इंग्रजांबरोबरच्या तहामुळे रघोजींवर अनेक निर्बंध आले. ते १८३८ मध्ये कुलाबा येथे निधन पावले. त्यांना दोन मुलगे होते. त्यांपैकी एक रघोजींच्या अगोदर मृत्यू पावला व दुसरा रघोजींच्या मृत्यूनंतर जन्मास आला. त्यांचे नाव ‘कान्होजी’असे ठेवण्यात आले, परंतु ते अल्पवयीनच १८३९ मध्ये मरण पावले. त्यामुळे कंपनी सरकारने कुलाबा संस्थानाची जप्ती केली. १८३९–४४ ह्या अवधीत राण्यांनी दत्तक घेण्याबाबत खटपट चालविली होती, पण कंपनी सरकारने मयत दुसरे कान्होजी आंग्रे ह्यांस वारस नाही म्हणून १८४४ मध्ये कुलाबा संस्थान खालसा केले, आणि डेव्हिस ह्या इंग्रजी अधिकाऱ्यास दिवाण विनायक परशुराम ह्यांजकडून संस्थानच्या सर्व मालमत्तेचा ताबा घेण्यास फर्माविले.
कुलाबकर सरखेल आंग्रे यांची एक शाखा मूळ संस्थापक कान्होजी यांचे चिरंजीव येसजी यांच्या वेळेपासून ग्वाल्हेरास आहे. येसजींची मुलगी मैनाबाई ही त्या वेळी शिंदे घराण्यात दिली होती. हे शिंदे पुढे ग्वाल्हेरात संस्थानाचे अधिपती झाली. त्या वेळी सरखेलपद मिळण्याची संधी आपणास नाही असे पाहून येसजींचे मुलगे मावजी व बाबुराव हे बहिणीकडे जाऊन राहिले. बाबुरावांनी आपल्या सेनेसह शिंदे ह्यांना अनेक लढायांत मदत केली म्हणून आंग्र्यांना भोरासा, नेओरी आणि पानविहार हे भाग जहागीर म्हणून मिळाले. शिवाय सर्व लवाजमा व ‘वजारत-माब-सरखेल’ ह्या किताबात ‘सवाई’ हा आणखी एक किताब बहाल करण्यात आला. बाबुरावांस संतती नसल्यामुळे त्यांनी मावजी ह्या आपल्या भावाचा संभाजी हा मुलगा दत्तक घेतला व ते अलिबागेस परतले. ह्या वेळी माळव्यात अनेक उचापती व लूटमार चालू होती. ती संभाजींनी थांबवून ग्वाल्हेर संस्थानास हरएक प्रकारे मदत केली. म्हणून शिंद्यांनी आणखी काही मुलूख त्यांस दिला. संभाजींसही मुलगा नसल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा मुलगा अप्पासाहेब (बाबुराव) हा १८३९ मध्ये दत्तक घेतला. संभाजी १८४६ मध्ये मरण पावले. बाबुरावांनी संस्थानात अनेक हुद्द्यांच्या जागांवर काम केले. त्यांनाही मुलगा नसल्यामुळे त्यांनी अलिबागकर आंग्रे घराण्यातील ‘त्र्यबकराव’ नावाचा मुलगा दत्तक घेण्याचे ठरविले, तथापि ते १८९१ मध्ये दत्तक घेण्यापूर्वी मृत्यू पावले. तेव्हा त्यांनी ठरविलेला दत्तक पुढे १८९२ साली घेण्यात येऊन त्याचे नाव ‘संभाजी ’ ठेवण्यात आले. त्यांना १८९६ मध्ये मुलगा झाला. हे चंद्रोजीराव व त्यांचे चिरंजीव संभाजीराव सध्या विद्यमान असून चंद्रोजीराव हे विद्वान, अभ्यासू व समाजकार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. संस्थानिकांच्या राजकारणात त्यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष होते.
संदर्भ : 1. Burrows, C. B., Pub. Representative Men of Central India, Bombay, 1902.
            2. Sen, S. N. The Military System of the Marathas, Calcutta, 1958.
            ३. ढबू, दा. गो. कुलाबकर आंग्रे सरखेल,  अलिबाग, १९३९.
About 478 results (0.60 seconds)
Dahisar West, Mumbai, Maharashtra – From your search history – Use precise location
 – Learn more
Help Send feedback Privacy Terms

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisements

Author: bcp211

BUSINESSMAN AND AGRICULTURIST

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s